धर्मादाय रूग्णालयांच्या तपासणीसाठी विशेष पथक   

मुंबई, (प्रतिनिधी) : पुण्यातील दीनानाथ रूग्णालयात गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. धर्मादाय रूग्णालयांकडून गरिबांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा आणि निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करावेत, असे निर्देश बुधवारी येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. 

ऑनलाईन माहिती भरणे सक्तीचे

धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणार्‍या रूग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रूग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणार्‍या आणि महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणार्‍या रुग्णालयाची यादी तयार करावी. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणार्‍या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी दिले. राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रूग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतची माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
 

Related Articles